Daily Current Affairs in Marathi: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात.
जागतिक नेमबाजी स्पर्धा: अखिलमुळे भारताला पाचवा ‘ऑलिम्पिक कोटा’

- भारताच्या अखिल शेरॉनने जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत पुरुष विभागातील रायफल थ्री-पोझिशन प्रकारात रविवारी कांस्यपदक पटकावताना भारताला पाचवा ‘ऑलिम्पिक कोटा’ मिळवून दिला.
- पात्रता फेरीत शेरॉन ५८५ गुणांसह सहाव्या स्थानावर राहिला होता. अंतिम फेरीत शेरॉनने ४५० गुणांची कमाई करताना कांस्यपदक मिळवले. अंतिम फेरीतील पहिले चार क्रमांकांचे खेळाडू देशासाठी ‘ऑलिम्पिक कोटा’ मिळवतात. ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्झांडर श्मिरलने ४६२.५ गुणांसह सुवर्ण, तर चेक प्रजासत्ताकच्या पीटर निम्बस्र्कीने ४५९.२ गुणांसह रौप्यपदक पटकावले.
- भारतासाठी यापूर्वी भोवनीश मेडीरत्ता (पुरुष ट्रॅप), जगज्जेता रुद्रांक्ष पाटील (१० मीटर एअर रायफल पुरुष), स्वप्निल कुसळे (५० मीटर रायफल थ्री-पोझिशन पुरुष) व मेहुली घोष (१० मीटर एअर रायफल महिला) यांनी ‘ऑलिम्पिक कोटा’ निश्चित केले आहेत.
- दरम्यान, भारताच्या महिलांनी २५ मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धा प्रकारात सुवर्णपदक कमावले. रिदम सांगवान, ईशा सिंह आणि मनू भाकर यांच्या संघाने एकत्रित १७४४ गुणांची कमाई करताना ही सोनेरी कामगिरी केली. अंतिम फेरीत भारतीय संघाने तैवानच्या तिएन शिया, तु यी त्झु आणि वु शिया यिंग (१७४३) या संघाचा पराभव केला. चीनला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
- दरम्यान, अखिल शेरॉन, ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर, निरज कुमार यांनी एकत्रित १७५० गुणांसह पुरुषांच्या राफल थ्री-पोझिशन प्रकारात सांघिक सुवर्णपदक पटकावले. अखिलचे दिवसभरातील हे दुसरे पदक ठरले. सुवर्णपदकाबरोबर ‘ऑलिम्पिक कोटा’ मिळवल्याचा आनंद असल्याचे अखिलने सांगितले. वैयक्तिक प्रकारात अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. प्रयत्न कमी पडले. हा ‘ऑलिम्पिक कोटा’ मी देशाला अर्पण करतो, असेही अखिल म्हणाला.
चांद्रयान ३ चंद्रावर उतरताना कधी व कुठे पाहाल? वेळ जाणून घ्या
- लँडर मॉड्यूल (LM) ने त्याचे दुसरे आणि अंतिम डी-बूस्टिंग ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर भारताचे चांद्रयान-3 हे २० ऑगस्टला चंद्राच्या आणखीन जवळ पोहोचले आहे. आता, लँडर एका कक्षेत पोहोचला असून चंद्राचा सर्वात जवळचा बिंदू अवघ्या २५ किमी दूर आहे तर सर्वात दूरचा बिंदू १३४ किमी अंतरावर आहे. यासंदर्भात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) माहिती दिली असून आता मॉड्युलची अंतर्गत तपासणी केली जाईल आणि नियुक्त ठिकाणी लँडिंगसाठी सूर्योदयाची प्रतीक्षा आहे असेही सांगितले आहे.
- १४ जुलै रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून चंद्रावरील भारताची तिसरी मोहीम यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आली. काही आठवड्यांनंतर, ५ ऑगस्ट रोजी लँडरने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता आणि आता चांद्रयान ३ लँडिंगसाठी सज्ज झाले आहे. हे लँडिंग नेमके कधी व कुठे होईल तसेच तुम्हाला ते कुठे पाहता येणार आहे याविषयी जाणून घेऊया.
चांद्रयान- ३ चे लँडिंग कधी आणि कुठे होईल?
- लँडर मॉड्यूल २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे, जर हे लँडिंग यशस्वी झाले तर भारत हा पराक्रम साध्य करणारा अमेरिका, चीन आणि रशियानंतर चौथा देश बनणार आहे. इस्रोने एका ट्विटद्वारे ऐतिहासिक लँडिंगची तारीख आणि वेळ जाहीर केली असून २३ ऑगस्टला संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर उतरणार आहे.
- इस्रोने यापूर्वी माहिती दिली होती की लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशावर ‘सॉफ्ट लँडिंग’ करण्याचा प्रयत्न करेल. लँडरचा चंद्राच्या पृष्ठभागावर स्पर्श झाल्यानंतरही, त्याचे मॉड्यूल पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी चंद्राभोवती फिरत राहील.
चांद्रयान ३ चे लँडिंग कधी आणि कुठे पहावे?
- ISRO च्या माहितीनुसार, जगभरात कुठूनही तुम्ही चांद्रयान-3 मोहिम लाईव्ह पाहू शकता. बुधवारी २३ ऑगस्टला संध्याकाळी ५ वाजून २७ मिनिटांपासून हे स्ट्रीमिंग थेट प्रक्षेपित केले जाईल. आपण ISRO वेबसाइट, YouTube, ISRO चे Facebook पेज आणि DD National TV चॅनल इथे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकणार आहात. यासंदर्भातील सर्व अपडेट्स वेळोवेळी जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या मुख्य पृष्ठावरसुद्धा आपल्याला माहिती मिळवता येईल.
रशिया अपयशी, आता भारत प्रयत्न करणार; पण चंद्रावर अलगद उतरणारे पाहिले यान कोणते, कोणत्या देशाचे होते?
- ४ ऑक्टोबर १९५७ ला सोव्हिएत रशियाने (soviat russia) जगातील पहिला कृत्रिम उपग्रह स्फुटनिक (Sputnik 1) अवकाशात पाठवला आणि तेव्हा शीत युद्धासाठी आणखी एक मैदान खरं तर अवकाश उपलब्ध झाले. अवकाशात विविध प्रकारचे उपग्रह पाठवत कुरघोडी करण्याची स्पर्धा तेव्हाचे शक्तीशाली देश अमेरिका आणि सोव्हिएत रशियामध्ये सुरु झाली.
- विविध उपग्रह पाठवत रशियाने पुढील काही वर्षे ही आघाडी टीकवत अनेक विक्रम रचले. अखरे रशियाच्या आधी अंतराळवीर चंद्रावर उतरवत अमेरिकेने ही अत्यंत खार्चिक पण अवकाश तंत्रज्ञानात आमुलाग्र बदल करणारी अवकाश स्पर्धा जिंकत रशियाला मागे टाकले.Daily Current Affairs in Marathi
- मात्र सोव्हिएत रशियाने चंद्राच्या बाबतीत अनेक विक्रम रचले. चंद्राच्या जवळून जाणारे पहिले यान, चंद्राचे छायाचित्र घेणारे पहिले यान, तेव्हापर्यंत कधीही न दिसलेल्या चंद्राच्या मागच्या बाजूचे छायाचित्र काढणारे पहिले यान, चंद्रावर आदळवत पहिले मानवी अस्तित्व उमटवणारे पहिले यान, चंद्राचा उपग्रह म्हणून प्रदक्षिणा घालणारे पहिले यान म्हणून रशियाच्या विविध यान-उपग्रहांनी यशस्वी कामगिरी बजावली.
- यामध्ये आणखी एक पराक्रम तेव्हाच्या सोव्हिएत रशियाच्या तंत्रज्ञानांनी करुन दाखवला. चंद्रावर अलगद उतरण्याची (soft landing) स्पर्धा अमेरिका आणि रशियामध्ये सुरुच होती. चंद्रापर्यंत पोहचतांना दोन्ही देशांना अनेक मोहिमांच्या अपयशाला सामोरं जावं लागलं. मात्र ३ फेब्रुवारी १९६६ रशियाचे Luna 9 हे यान चंद्राच्या विषुववृत्तावर यशस्वीपणे अलगद उतरले.
प्रज्ञावान प्रज्ञानंद विश्वचषकाच्या अंतिम फेरीत; जेतेपदासाठी कार्लसनशी गाठ
- भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने आपली स्वप्नवत घोडदौड कायम राखताना अमेरिकेच्या फॅबियानो कारूआनाला पराभवाचा धक्का देत सोमवारी विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता जेतेपदासाठी त्याला अव्वल जागतिक बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनला नमवण्याची किमया साधावी लागेल.
- पारंपरिक पद्धतीचे दोन डाव बरोबरीत सुटल्यानंतर ‘टायब्रेकर’मध्ये गेलेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत १८ वर्षीय प्रज्ञानंदने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या कारूआनाला ३.५-२.५ अशा फरकाने पराभूत केले. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा प्रज्ञानंद हा विश्वनाथन आनंदनंतरचा दुसरा भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे. आनंदने सन २००० आणि २००२मध्ये विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. मात्र, त्यावेळी ही स्पर्धा साखळी आणि बाद पद्धतीने खेळवली जात होती. तर २००५पासून विश्वचषक स्पर्धा केवळ बाद फेरी पद्धतीने खेळवली जात आहे. त्यामुळे प्रज्ञानंदच्या यशाला विशेष महत्त्व आहे.
- यंदाच्या विश्वचषकात प्रज्ञानंदने यापूर्वी दुसरा मानांकित हिकारू नाकामुरा आणि भारतीय सहकारी अर्जुन एरिगेसी यांसारख्या खेळाडूंचा पराभव केला होता. त्याने कारूआनाविरुद्धही अप्रतिम खेळ केला. प्रज्ञानंद आणि कारूआना यांच्यातील पारंपरिक पद्धतीचे दोन आणि ‘टायब्रेकर’मधील दोन डाव बरोबरीत सुटले. मात्र, १० मिनिटांच्या पहिल्या जलद डावात पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना प्रज्ञानंदने विजय नोंदवला. दुसऱ्या डावात कारूआनाला पांढऱ्या मोहऱ्यांनी विजय मिळवता आला नाही आणि प्रज्ञानंदचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित झाले.
- पारंपरिक पद्धतीच्या डावात कारूआनाचे पारडे जड होते. मात्र, दोन्ही डावांत त्याने धोका पत्करणे टाळले आणि लढत ‘टायब्रेकर’मध्ये गेली. ‘टायब्रेकर’मध्ये चाली रचण्यासाठी बुद्धिबळपटूंकडे कमी वेळ असतो आणि या दडपणाखालीच खेळ उंचावणारा म्हणून प्रज्ञानंद ओळखला जातो. याचाच प्रत्यय कारूआनाविरुद्धच्या लढतीत आला. मात्र, प्रज्ञानंदने योजनाबद्ध खेळ करताना सामन्याचे पारडे आपल्याकडे झुकवले होते.Daily Current Affairs in Marathi
तलाठी भरती परीक्षेत अडथळे; तांत्रिक अडचणींमुळे दोन तास विलंब; ‘टीसीएस’ला कारणे दाखवा नोटीस
- तांत्रिक बिघाडामुळे तलाठी भरतीच्या ऑनलाइन परीक्षेला सोमवारी दोन तास विलंब झाला. मात्र, परीक्षा सुरळीत पार पडली. नियोजित वेळेपेक्षा विलंब झाल्याने परीक्षा घेणाऱ्या ‘टीसीएस’ कंपनीला भूमी अभिलेख विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. तसेच तलाठी भरतीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असून, परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली नसल्याची स्पष्टोक्ती भूमी अभिलेख विभागाकडून देण्यात आली.
- तलाठी भरतीसाठी यंदा १० लाख ४० हजार ७१३ असे विक्रमी अर्ज छाननीअंती प्राप्त झाले आहेत. ही परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत घेतली जाणार आहे. सोमवारी सकाळचे पहिले सत्र नऊ ते ११ या वेळेत होणार होते. मात्र, टीसीएस कंपनीच्या डाटा सेंटर सव्र्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दोन तासांच्या विलंबानंतर हे सत्र सुरू झाले. टीसीएस कंपनी आणि त्यांचे डाटा सेंटर यांनी देशभरातील परीक्षांबाबत हा तांत्रिक बिघाड झाल्याचे भूमी अभिलेख विभागाला कळविले. त्यानंतर तातडीने प्रत्येक जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी यांना प्रथम सत्रातील परीक्षा विलंबाने सुरू होणार असल्याचे कळविण्यात आले. त्यानुसार सर्व परीक्षा केंद्रांवरील उमेदवारांना स्थानिक प्रशासनाकडून सूचना देण्यात आली होती, अशी माहिती अप्पर जमाबंदी आयुक्त आणि तलाठी भरती परीक्षेचे राज्य समन्वयक आनंद रायते यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
- टीसीएस कंपनीकडून तांत्रिक बिघाड दूर करून राज्यातील सर्व ११५ केंद्रांवर सकाळी ११ वाजता परीक्षा सुरू करण्यात आली. पहिल्या सत्राला विलंब झाल्याने साहजिकच त्यानंतरच्या दोन्ही सत्रांनाही दोन तास विलंब झाला. याबाबतची माहितीदेखील स्थानिक प्रशासनाकडून संबंधित उमेदवारांना देण्यात आली. दिव्यांग उमेदवारांना सोमवारच्या दुसऱ्या सत्रात अतिरिक्त असणारा वेळही देण्यात आला. याबाबत शासनाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करीत असल्याचेही अप्पर जमाबंदी आयुक्त रायते यांनी सांगितले.
- सोमवारी तांत्रिक कारणांमुळे परीक्षेला झालेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. नेमका कशामुळे विलंब झाला, याबाबत सविस्तर माहिती सादर करण्याच्या सूचना कंपनीला देण्यात आल्या आहेत. तसेच पुढील सत्रातील सर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच पार पडणार आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.Daily Current Affairs in Marathi